Sunday, December 5, 2010

झाला महार पंढरीनाथ

श्री. संत दामाजीपंत

            मंगळवेढयाचे सर्व संतापेक्षा श्री दामाजीपंतांची प्रसिध्दी फार आहे. त्यांचेच नावाने ही नगरी ओळखली जाते. इ.स. १४४८ ते १४६० ही दोन वर्षे श्री दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखली जातात. याच काळात दामाजीपंतानी मंगळवेढे येथे तहसीलदार असताना बिदर बादशहाचे अवकृपेची भिती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुके ने व्याकूळ झालेल्या व मरणोन्मुख झालेल्यांना फुकट वाटले व लाखो लोकांचे जीव दुष्काळ समयी जगविले.
बादशहाने या गुन्ह्याबद्दल श्री दामाजीपंतांना पकडून बिदर ला नेले. पण संकटकाळी भक्तांचा पाठीराखा पंढरीचा पांडूरंग विठू महाराचे रुप घेऊन बिदर दरबारात गेला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेऊन आला.
 
 
दामाजी मंदीरातील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री दामाजीपंताची मुर्ती

 श्री संत दामाजी मंदीर, मंगळवेढा
 
 
त्यामूळे श्री दामाजीपंताना बिदर दरबारात हजर करताच बादशहाने त्यांचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने तुमचे पैसे पोचते केलेचे बादशहाने सांगितले. श्री दामाजीपंतांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार व आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते याबद्द्ल त्यांना विस्मय वाटला. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नौकरीचा राजीनाम तात्काळ दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
 

झाला महार पंढरीनाथ

         दामाजीपंतांना तर आता अटक झाली. पण आपल्या भक्ताला बादशहापासून सोडविण्यासाठी खुद्द पंढरपूरचा पांडूरग गेला. तो ही विठू महाराच्या वेशभूषेत. ती कथा अशी आहे..............
 
        दामाजीपंतांच्या मामलेदार कचेरीत विठू नावांचा एक महार अतिशय प्रामाणिक नोकर होता. त्याकाळी महसूल महाराकरवी राज दरबारी भरण्याची पध्दत होती. आणि हिच युक्ती पंढरीच्या पांडूरंगाने लडविली. डोकीवर फाटकं मुंडास, मलीन फाटके धोतर, खांद्यावर घोंगडी, पायात वहाणा, व हातात घुंगराची काठी आणि कपाळावर गंधाचा टिळा, असे हे पांडूरंगाचे रुप.
        बिदरमध्ये पांडूरंग, विठू महाराच्या रुपात गेले असता, असे म्हंटले जाते की, त्यांनी एक पाऊल बिदरच्या वेशीत तर दुसरे पाऊल चक्क बादशहाच्या दरबारात ठेवले. अचानक प्रकट झालेल्या विठूला पाहून बादशहाच्या वजीराने, आपण कोण? कुठून आलात? आत यायला आपणास कोणी अडवले नाही का? असे प्रश्न केले.
      त्यावर विठू महार नम्रतेच्या सुरात व धीर गंभीर होऊन म्हणाले, " मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा प्रामाणिक नोकर आहे. मला विठू महार म्हणतात. माझ्या धन्यास (दामाजीपंत) दुष्काळाने झालेले जनतेचे हाल पाहावेनात, म्हणून हुजूर त्यांनी आपल्या ताब्यातील धान्यांनी भरलेली कोठारातील धान्य विकून, असाहाय्य जनतेचे प्राण वाचविले. त्या मोबदल्यात पैशाचा भरणा करण्यासाठी दामाजीपंतांनी मला पाठवले आहे. असे म्हणून विठू महाराने (पांडूरंगाने)  कमरेची थैली काढून बादशहाच्या दरबारात अमीर उमराव यांचे समोर उघडी केली तेंव्हा त्यातून खळखळ असा आवाज होत मोहरांचा प्रचंड ढिग लागला. एवढ्या लहानशा पिशवीतून एवढा मोठा मोहरांचा ढिग पाहून बादशहा आ वासून बघत राहिला. अमीर उमराव व दरबारातील सर्व जनता एकमेकांकडे डोळे वासून आश्चर्याने पाहू लागली. लोकांना कळण्याच्या आत पांडूरंगाने  पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. आणि पावती मिळताच पांडूरंग दरबारातून अदृश्य झाले, ते थेट दामाजीपंत बिदरच्या वाटेवर ज्या ठिकाणी मुक्कामी होते, आणि तेथेच अदृश्य रुपात ती पावती गीतेच्या ग्रंथात ठेऊन पंढरपूर ला गेले.
 
  
श्री पांडूरंगाचे बिदरच्या वेशीतील उमटलेले पाऊल


   
      विठू महाराच्या वेशभूषेत, पंढरीच्या पांडूरंगाने बिदरच्या वेशीत ठेवलेले पहिले उजवे पाऊल, तेथे उमटले व ते अजून ही जवळ जवळ ८०० वर्षांनंतर तसेच आहेत. या पाऊलाची रोज सकाळी पूजा केली जाते. दुसरे पाऊल दरबाराच्या घुमट वेशीपाशी आहे तेथे ही ते उमटले आहे व त्याची पण रोज सकाळी पूजा केली जाते. मुसलमानी राजवटीपासून ही पावले तेथे आहेत. असे म्हंटले जाते की ही पावले नष्ट करण्याचा प्रयत्न ब-याच वेळेला केला, पण त्यात यश आले नाही, असे बिदर मधील नागरिक सांगतात.

No comments:

Post a Comment