Monday, December 6, 2010

महार आडनावे

लढवय्या कामगार नेता
कॉम्रेड आर. बी. मोरे


 
डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतून एकेकाळी काही तरुण कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षात गेले त्यामध्ये आर. बी. मोरे यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याचाही समावेश होता. कम्युनिस्ट पक्षात जाण्यासाठी बाबासाहेबांनीच त्यांना नकळत संमतीच दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या आर. बी. मोरे यांच्या या बदललेल्या राजकीय प्रवासाबद्दल समकालीनांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी आंबेडकर व मोरे यांच्यातील वैचारिक नाते हे अत्यंत घट्ट होेते. त्याची साक्षा अनेक प्रसंगातून मिळत राहाते. डॉ. बाबासाहेब कॉ. मोरेंच्या बाबतीत म्हणाले होते, ‘‘हा आर. बी. मोरे फार मोठा माणूस. ज्या थोड्या व्यक्तींच्या प्रयत्नामुळे मी राजकारणात प्रवेश केला त्यातील हे एक मोरे.‘‘ (संदर्भ दलित व कम्युनिस्ट चळवळीचा सशक्त दुवा- कॉ. मोरे).
कॉ. मोरे ज्या वर्गातून चळवळीत आले होते त्याची शिकवण त्यांना त्यांच्या जगण्याच्या अनुभवातून आली होती. अगदी शालेय जीवनातून त्यांना अनेक प्रसंगी अवहेलना सहन करीत शिकावे लागले होते. मुळात ते नम्र होते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार, चळवळ ही आपली आणि आपल्या समाजाची जगण्याची दिशा आहे. या वाटेवरूनच चळवळीचा मार्ग सापडेल, अशी त्यांना आशा होती. त्यामुळेच या मार्गाला जवळ करून तो शेवटपर्यंत चळवळीसाठी जगले. ‘बहिष्कृत भारत‘ हे डॉ. बाबासाहेबांनी सुरू केलेले वर्तमानपत्र चालविण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
कॉ. मोरेंचा जन्म १ मार्च १९०३ सालचा. २००३ साली जन्म शतवार्षिक साजरे झाले आणि शंभर वर्षांनंतर त्यांच्या नावाने त्यांच्या म्हणजे त्यांचे ज्या गावाला शिक्षण झाले त्या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचे नाव देण्याचा कार्यक्रम होत आहे. हे त्यांचे पहिले स्मारक. आंबेडकरी चळवळ व कम्युनिस्ट चळवळीचे एक अग्रणी, क्रांतिकारक चळवळीतील नेहमीच कार्यरत राहिलेले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म लाडवळीचा (आजोळी) त्यांचे मूळगाव मुंबई-गोवा हमरस्त्यावरील माणगाव तालुक्यातील लोणरे. जिथे आज डॉ. आंबेडकर तंत्र विद्यालय आहे. दासगाव ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. त्याच गावात हा नामांतराचा सोहळा होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे.
कॉ. मोरे यांचे जीवन म्हणजे एक काट्याकुट्याचा प्रवास. मनस्ताप, अपमान, अवहेलना, आमिषे लाथाडून पुन्हा सहन करून ते हे जीवन जगले. त्यांच्या या कहाण्या चळवळीतील अनेक वयस्कर मंडळी सांगताना दिसतात.
त्या काळात अस्पृश्यांना घरांवर कौले घालता येत नव्हती. काहीची आर्थिक परिस्थिती असूनही स्पृश्य म्हणायचे, ‘अस्पृश्य माजले असा तो काळ.‘ कोकणातील थोड्या मंडळींना शिक्षण मिळाले ते केवळ त्यांच्या मिलिटरी पेशांमुळे. कोकणात अस्पृश्यांना शिक्षण देणारी एकमेव शाळा होती दासगावला. त्याच शाळेत मोरेंच्या मोठ्या भावाने शिक्षण घेतले आणि ते शिक्षक झाले. मोरेंच्या वडिलांचे मामेभाऊ देखील याच शाळेतून शिकून शिक्षक झाले. त्यांना मासिक पगार सात रुपये होता. दासगाव बंदरावरचे गाव. त्यांच्या वडिलांचे मामा विठ्ठल जोशी (जोशी आडनावे पूर्वी महारांमध्ये होती) ज्योतिष पंचांग पाहणे, हा त्यांचा खानदानी व्यवसाय होता. त्यांना मोडी लिपी अवगत होती. ते जोशी गहाण खते, खरेदी खते, शासकीय कागदपत्रे बनवून देत आणि त्यांना त्यांचे पैसे मिळत. त्यानंतर ते जंगल ठेकेदार झाले. रत्नागिरी दापोलीला जाणार्‍या रस्त्यावर दासगाव, त्या गावाला लष्करातून सेवानिवृत्त झालेली पूर्वाश्रमीची महार मंडळी स्थायिक झाली होती. आणि इतर ठिकाणची अनेक मंडळी याच गावात स्थायिक होण्यासाठी इच्छुक असायची. थोडक्यात याच गावात महार लोकांचे वर्चस्व होते.
१९१४ साली अलिबागला स्कॉलरशिपच्या परीक्षेला पहिला आलेला मोरे विद्यार्थी दासगावच्या शाळेतील होता आणि महिना स्कॉलरशिप होती पाच रुपये. शिक्षकाला पगार होता सात रुपये. म्हणजे विचार करा ही रक्कम केवढी मोठी होती. पण पुढे महाडच्या शाळेत मोरेंना प्रवेश मिळेना. दोन वर्षे फुकट गेली. आणि प्रवेश मिळाला केवळ यशवंत गोपाळ टिपणीस यांच्या प्रयत्नामुळे. पण महाडच्या धारप कर्मठ घराण्याचे शिक्षक काय म्हणाले, ‘‘माझे जिवात जीव असेपर्यंत मी तुला शिवणार नाही‘‘ अशी मोरेंना वागणूक मिळत होती.
मोरेंना शाळेत पाणी मिळेना. विद्यार्थीदशेत असताना महाडमध्ये येणार्‍या समाजातील स्त्रियांना, मिलिटरी पेन्शनर यांना कचेरीबाहेर उन्हात उभे रहावे लागते. मोळ्या विकणार्‍या बायांना बाजारात पाणी मिळत नाही यासाठी आपल्याला काहीतरी करावेच लागेल म्हणून मोरेंनी गावात अनेक मंडळींशी चर्चा केली आणि गाडीतळात चहाचे हॉटेल काढण्याचे धाडस केले. शेतात मांडव घालून अस्पृश्यांची चहाची आणि पाण्याची व्यवस्था झाली. त्यासाठी मोरेंच्या सांगण्यावरून मोहोतकर नावाचे पहिले महाडचे दुकानदार म्हणून नावाजले.
पुढे मोरे यांच्या प्रयत्नामुळे पेठेत दुसरे हॉटेल सुरू झाले. कारण गाडीतळातले हॉटेल पावसाळ्यात बंद करावे लागे. मोरेंनी शाळेबरोबर सामाजिक व्यापही लावून घेतले होते. तो त्यांच्या धडपडण्याचा स्वभाव होता. हे हॉटेल म्हणजे सुमारे २०० महार लोकांचे एक विचारआचार करण्याचे एक ठिकाण झाले.
आपल्या महाडमध्ये अस्पृश्यता केव्हा आणि कशी नष्ट करता येईल याचा त्यांनी ध्यासच घेतला. जनतेत जागृती घडविण्याची नितांत गरज आहे, हे त्यांनी जाणले आणि समाजबांधवांना संघटित केले. हे तसे विचारांना चालना देणारे काम सोपे नव्हते. त्यांचे शिक्षण चालू असताना १९२० पर्यंत डॉ. बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची त्यांनी माहिती मिळविली आणि डॉ. बाबासाहेबांना एकदाचे भेटावयाचे हे मनात नक्की केले. १९४५ च्या ऑक्टोबरमध्ये पॅरिस आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेसाठी कॉ. मोरे यांची निवड झाली आणि त्या परिषदेला ते हजर झाले. सल्लागार प्रतिनिधी नात्याने समितीच्या अहवालावर त्यांनी भाषण केले. ‘अस्पृश्य जातीत जन्मलेल्या कामगारांना भारतात कामगार म्हणूनही समान वागणूक दिली जात नाही. मुंबईतील गिरण्यातील कापड खात्यात त्यांना प्रवेश दिला जात नाही व सरकारही त्याकडे दुर्लक्ष करते‘‘ ही गोष्ट आय्‌.एल.ओ.च्या व कम्युनिस्ट चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मांडून त्यांनी इतिहास घडविला. १९२८ च्या दरम्यान ऐतिहासिक संप झाला, त्यावेळी मागणी करण्यात आली होती. कापड विणण्याच्या कामात कामगाराला तोंडात धागा धरावे लागे. हेच काम मुसलमान वा ख्रिश्चन कामगाराला दिले तर सवर्ण हिंदू गिरणी कामगार विरोध करीत नसत. पण कापड विणण्याच्या कामात अस्पृश्य कामगाराला वगळले जायचे. स्वतः बाबासाहेबही कम्युनिस्टांचा हा उणेपणा दाखवायचे, हे कॉ. मोरेंना माहिती होते. त्याआधी आंतरराष्ट्रीय कामगार परिषदा झाल्या, पण अस्पृश्य कामगारांची ही अवहेलना मांडण्यात आली नव्हती. मोरेंवर कम्युनिस्ट पक्षाने टीका केली. तरीही पक्षाला त्यांच्या कार्याची आणि शोषित कामगारांच्या प्रती असलेली निष्ठा माहीत होती. म्हणूनच पक्षही सावध होता.
कॉ. मोरे जेव्हा जेव्हा बाबासाहेबांना भेटत, तेव्हा कम्युनिस्ट पक्षाची प्रकाशने त्यांना नेऊन देत. तेव्हा डॉ. बाबासाहेब त्या साहित्याचे पैसे मोरेंच्या हाती देत. मोरेंची आर्थिक स्थिती त्यांना ठाऊक होती. त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये हा त्याच्यामागचा उद्देश होता. डॉ. बाबासाहेबांची साथ सोडून त्यांचे अनुयायी काँग्रेस पक्षात सामील झाले. व्यक्तिगत स्वार्थासाठी. मोरे ध्येयवादाने कम्युनिस्ट पक्षात गेले. कम्युनिस्ट वैयक्तिक स्वार्थासाठी काम करीत नाहीत हे डॉ. बाबासाहेबांना ठाऊक होते. म्हणून भर सभेतून डॉ. बाबासाहेब गरजायचे, ‘कॉ. मोरेंकडे पाहा.‘ त्यांना मोरेंबद्दल नेहमीच आदर वाटायचा. त्या वेळचे बाबासाहेबांचे अनुयायी व्यक्तिवादावर पोसलेले होते. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांत आणि मोरेंमध्ये हाच नेमका फरक होता. कॉ. मोरेंच्या डोक्यात खासदार/ आमदार ही पदे आणि स्वार्थी राजकारण नव्हते. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने दोनदा उभे राहण्याचे सुचविले, पण कॉ. मोरेंनी नम्रपणे डॉ. बाबासाहेबांना नकार दिला. डॉ. बाबासाहेबांना देखील कॉ. मोरेंच्या प्रेमामुळे, आदरामुळे आग्रह करता आला नाही.
नासिक मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी कॉ. मोरे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. पक्ष संघटना आणि कामगार संघटना बांधण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्या पक्षाची त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. १९३० साली ‘आव्हान‘ नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. त्यात शेतकरी व अस्पृश्य यांचे लढे आणि त्यांच्या समस्या मांडल्याच, पण नासिक मंदिर सत्याग्रह समर्थनार्थ स्वतःच्या अध्यक्षतेखाली सभा घेतल्या. आणि त्यासाठी निधी गोळा केला. एवढेच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचे नेतृत्व कॉ. बाबुराव गरुड यांच्याकडे सोपविले. १९३०-३१ च्या दरम्यान मोरे यांचे काम कुलाबा जिल्ह्यात सुरू असताना गिरणी कामगार, गोदी कामगार, रेल्वे कामगार, बी.ई.एस.टी. कामगार यांच्या संघटनेत नेते सक्रिय होते. ‘रेड ट्रेड युनियन काँग्रेस‘ची स्थापना करण्यात आली. तिच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगार युनियनची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात कॉ. जांभेकर, कॉ. मोरे यांची निवड झाली. या युनियनच्या कार्यालयात पाण्याची दोन मडकी दिसू लागली. एक अस्पृश्यांसाठी आणि एक स्पृश्यांसाठी. कॉ. मोरेंना हा प्रकार खटकला. कॉ. मोरेंनी कॉ. रणदिवेंच्या हे कानावर घातल्यावर तेही गोंधळले. मोरे एवढेच म्हणाले, ‘‘मडके एकच ठेवा. जाती-पातीचा विटाळ ज्यांना असेल ते बाहेर हॉटेलात पाणी पितील. यातून आपणही कम्युनिस्ट जाती-पातीच्या बाबतीत किती कठोर आहोत, हेही स्पष्टपणे लोकांपुढे जाईल. असे आपण निर्भयपणे करीत नाही, म्हणूनच दलितांची स्वतंत्र चळवळ उभी राहलेली आहे.‘‘ १९३३ नंतर कार्यालयातील पाण्याचे मडके कायमचे फोडण्यात आले. आणि एकच मडके सगळ्यांसाठी दिसू लागले. ही आंबेडकरांच्या स्वतंत्र चळवळीने कम्युनिस्ट चळवळीला दिलेली देन आहे.
कॉ. मोरे महार समाज सेवा संघाचे चिटणीस होते. ठिकठिकाणी सामाजिक, राजकीय विषयांवर केशव ठाकरे, श्यामराव परुळेकर, एस. व्ही. देशपांडे इत्यादी मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून शोषित समाजाला जागृत करण्याचे काम कॉ. मोरे यांनी निःस्वार्थपणे केले. त्यामुळे समाज बोलू लागला. जो समाज मुका-बहिरा होता तो जागृतीचे गाणे गाऊ आणि ऐकू लागला. १९३० च्या दरम्यान मोरे कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. मानवाच्या अंतिम शोषण मुक्तीचे काम ते करावयास निघाले होते, हे ऐकल्यावर कॉ. मोरेंवर डॉ. बाबासाहेब रागावले नाहीत. त्यांचे धाडस पाहून ते म्हणाले, ‘‘मी तुझ्या प्रामाणिकपणाने व ध्येयवादाने भारावून गेलो आहे. मला तुझा अभिमान वाटतो. मला एक शिष्य असा लाभला की, जो माझ्या जातीचा आहे. भेकड नाही. शूर आहे तो स्वतःच म्हणतो मी तुम्हाला जाणीवपूर्वक सोडून अखिल मानव जातीच्या मुक्तीच्या लढाईत सामील व्हायला जात आहे!! शेवटी डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘तिकडे जाऊनही तू किमान माझ्या वर्तमानपत्र चालविण्याच्या कार्यातही सहभागी राहिलास तर मला आनंदच वाटेल. शेवटी तुझी मर्जी. माझा तुझ्या जाण्याला बिलकूल विरोध नाही,‘‘ अशा तर्‍हेने कॉ. मोरेंना निरोप देण्यात आला. आज कित्येक वर्षांनी दासगावला त्यांच्या नावाने शाळेचे उद्‌घाटन होत आहे. शैक्षणिक चळवळीचे स्मारक नवीन येणार्‍या पिढीला सतत प्रेरणा देईल. कॉ. मोरेंच्या कार्याचे तिथल्या भावकीने स्मरण केले हेही कमी महत्त्वाचे नाही. शोषितांच्या चळवळीसाठी जो जगतो आणि खपतो ती माती कधीतरी त्या कार्यकर्त्याची दखल घेते. कार्यकर्ता एकदाच जन्माला येतो. अर्थात कॉ. मोरेंसारखा ध्यासाने प्रेरित झालेला. ११ मे १९७२ साली मोरे यांचे मुंबईत निधन झाले. त्यांचे कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी झाले नाहीत. कॉ. मोरे यांच्या परिवाराने स्मशानातून त्यांच्या अस्थी आणल्या नाहीत वा मरणोत्तर धार्मिक विधीही केले नाहीत. ‘‘मोरे जरी कम्युनिस्ट होते तरी डॉ. बाबासाहेबांच्या सर्वात जवळचे जर कोण वाटत होते तर मोरे! असा बाबासाहेबांचा आवडता चेला हरपला आहे, अशा शब्दात डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांना आदरांजली वाहिली होती. यातच कॉ. मोरे किती मोठे होते ते दिसून येते.
रमाकांत जाधव

No comments:

Post a Comment