Sunday, December 5, 2010

गावरहाटीमधील ‘बारा-पाच’

गावरहाटीमधील ‘बारा-पाच’
मालवणी ही बोली भाषा कोकणातील ज्या भागात बोलली जाते त्या मालवणी मुलखातील ग्रामरचना, तेथील देवस्थाने, समाजरचना आणि पूर्वापार चालत आलेली एकूण जीवन पद्धती यांचा विचार, येथील गाव रहाटीमध्ये सामावलेला आहे. हा शब्द मालवणी बोलीत ‘गाव-हाटी’ असा उच्चारला जातो.
गावरहाटीच्या संदर्भातील पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे ‘बारा-पाच’ होय. हा शब्दसमूह रहाटीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रहाटी ही बारा पाचांचीच असते, इतरांचा प्रत्यक्षात त्यात समावेश बहुधा नसतो. त्यांच्या विचारानेच रहाटीमधील प्रत्येक गोष्ट कार्यान्वित होत असते.
त्यादृष्टीने संबंध गावाचा एक विचार म्हणजेच ‘बारा पाचाचे एक गणित’ करूनच गावगाडा चालता-फिरता ठेवावा लागत होता. त्याकाळी माणसे बहुधा शेती करूनच जगण्याचा प्रयत्न करीत होती. शेती हा त्यांचा जगण्याचा व्यवसाय होता आणि त्याला शाश्वती नव्हती.
गावरहाटीने त्यांना ती शाश्वती आणि स्थैर्य दिले. त्या प्रयत्नात सिंहाचा वाटा असलेल्या वतनदारांना त्यांचे धनीपण प्राप्त झाले.
शेतीच्या उद्योग व्यवसायात अनेकांचे सहकार्य लागते. त्यासाठी सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, तेली, परीट, कोष्टी, शिंपी, चांभार, सणगर, बुरूड, साळी अशा किमान बाराजणांची गरज असते. आपल्या भागत त्यांना ‘बलुतेदार’ असे म्हणतात, ही कुटुंबे शेती करू शकत नव्हती, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या गावातील शेतक-यांवरच पडलेली असे. अशा अवस्थेत त्या सर्वाना तो शेतकरी, शेतीमधून मिळालेल्या धान्याचा काही भाग, त्याच्या वेगवेगळ्या गरजा भागविणा-या हय़ा कुटुंबांना, देत असे त्याला बलुते असे म्हणत. त्यामुळे प्रत्यक्षात शेती न करता त्यांच्याही घरात धान्य येत असे. ही वस्तुविनिमय व्यवस्था (Barter System) गावरहाटीत अस्तित्वात होती!
गावरहाटीच्या संदर्भातील ‘बारा-पाचांमधील’ हय़ा बारा जाती!
गावरहाटीत पाच मानक-यांचा समावेश आहे. हय़ा मानक-यांमध्ये वतनदार म्हणून वेगवेगळय़ा काळात जी कुटुंबे हय़ा भागात आली; तेथील शेतकऱ्यांना ज्यांनी एकत्र आणून त्यांना परकीय आक्रमणापासून अभय दिले आणि त्यांच्याच सहकार्याने गावरहाटीची नवी समूहजीवन पद्धती रूढ केली, त्या वतनदारांना हय़ा ग्रामव्यवस्थेमध्ये ‘राजसत्ता’ सहजच प्राप्त झाली.
राजसत्तेच्या लोकांच्या कुलदैवतांसह, स्थानिक लोकांची जुनी ग्रामदैवते एकत्र आणली गेली आणि त्या सगळय़ा दैवतांना एकत्रितपणे रहाटीत सामील करून घेण्यात आले.
त्यानंतर प्रश्न आला तो त्या मंदिरांमधील देवदेवतांच्या दैनंदिन पूजापाठाचा आणि त्यामधील उत्सव व्यवस्थेचा. हय़ा व्यवस्थापनेचे बहुतेक अधिकार पूर्वी येथे वस्ती करून असलेल्या योग्य त्या लोकसमूहाला देण्यात आले.
राजसत्तेमधील वतनदारांनी हय़ा सगळय़ा उपक्रमांच्या संदर्भातील शेवटचा शब्द मात्र स्वत:कडे ठेवला! त्यामुळे रहाटीच्या देवळांपैकी कोणत्याही देवळांतील ग्रामदेवतांची पूजाअर्चा अथवा वार्षिक उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ‘राजसत्ता’ यजमानाच्या भूमिकेत वावरताना दिसते आणि तेथील प्रत्येक कार्य प्रत्यक्षात, पूर्वीच्या स्थानिक जमातींकडेच सोपविलेले असते. रहाटीच्या कार्यात यांच्या अधिकारांना काही मर्यादा आहेत. प्रत्यक्ष कार्यवाही करणे हा त्यांचा मान असला तरी, त्यात काही कारणामुळे खंड पडला तर पर्यायी व्यवस्था करण्याचा अधिकार मात्र राजसत्तेने (इतर घटकांची संमती घेऊन) स्वत:जवळ ठेवलेला दिसतो.
रहाटीने दिलेल्या अशा मानाची मर्यादा राखून पूर्वीच्या वस्तींमधील काही ठरावीक कर्त्यां जातींना राजसत्तेला जोडून पूर्व मर्यादेचा मान प्राप्त झाला. त्यामुळे गाव रहाटीमध्ये राजसत्ता आणि पूर्व मर्यादा अशा दोन स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या आणि त्यांच्या सहकार्याने कालपरवापर्यंत गावगाडा चालू लागला.
अशा पूर्वमार्यादेमध्ये साधारणत: चार मानकऱ्यांचा समावेश दिसून येतो. मालवणी मुलखातील पूर्व मर्यादेमध्ये १) परब २) घाडी ३) गुरव आणि ४) महार असे चार मानकरी आहेत. या तपशिलात स्थलपरत्वे काही बदलही आहेत. उदा. परबांपैकी प्रभू मुळये (परब) आहेत ते राजसत्तेमध्ये अंतर्भूत आहेत.
रहाटीच्या मंदिरापैकी एक शिवमंदिर असते. स्थानपरत्वे त्यांची नावे श्री लिंगेश्वर, रामेश्वर, कलेश्वर अशी असली तरी ही सगळी शिवमंदिरे आहेत. यापैकी काही स्वयंभू आहेत.
त्या मंदिरांची व्यवस्था आणि पुजारीपणाचा मान, शाकाहारी लिंगायत, गुरव अथवा जैन कुटुंबाला दिलेला आहे, त्यामुळे पूर्व मर्यादेमध्ये, हा गुरव एक मानकरी समजला जातो.
परब हे पूर्वमर्यादेमधील ‘प्रभू’ असावेत. वतनदारांच्या पूर्वीच्या वस्तीमध्ये हय़ा परबांचे प्राबल्य असावे असे वाटते. मालवणी भाषेमध्ये जुनी माणसे परब न म्हणता ‘परभू’ असे म्हणत असत. त्यामुळे ‘प्रभू’चा ‘परभू’ झाला. आता त्याचे रूप परब असे झालेले दिसते.
घाडी हा पूर्व मर्यादेमधील एक घटक आहे. गाव रहाटीमधील देवदेवस्की, पूजापाठ, अवसर(अंगात येणे), कौल, प्रसाद हय़ा उपचारांत हय़ाचा मोठा सहभाग असतो.
राहाटीचे ‘गावमेळे’ बहुधा देवळात घेतले जातात. मात्र श्री लिंगेश्वराच्या (शिव) मंदिरात कसलीही गावबैठक घेतली जात नाही, असा संकेत आहे.
पूर्व मर्यादेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महार. हा वर्ग या भूमीचा पहिला मालक समजला जातो. बारा बलुतेदारांना सुद्धा या रहाटीच्या कार्यात सामील करून घेतलेले आहे. हय़ापैकी प्रत्येकाचा छोटा मोठा सहभाग ग्रामसत्तेमध्ये आहे.
असे बारा बलुतेदार आणि १) राजसत्तेचा मानकरी २) परब ३) घाडी ४) गुरव आणि ५) महार अशा पाच मानकऱ्यांच्या कार्यकारिणीला ‘बारापाच’ असे म्हटलेले आहे. या घटकांमध्ये स्थल-कालपरत्वे तपशिलातील बदल संभवनीय आहे.

4 comments:

  1. Parab he aadnaav prabhu pasun bnle ky
    Bhau parab 96 kuli mdhe aahe ky bg

    ReplyDelete
    Replies
    1. Parab he aadnaav shakyato prabhu pasunch banale asave pan ashe purave uplabdh nahi aahet...96 kuli maratha mdhe parab nahi aahet

      Delete
  2. Pujare hyanch gotra Kay ahe Kay mahiti sangu shakta ka?

    ReplyDelete